जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रदेश तेली महासंघाच्या नाशिक विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरेश सुरळकर यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजकार्याच्या माध्यमातून तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचणाऱ्या नेतृत्वाला प्राधान्य देत, महासंघाने नव्या दमाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
या नियुक्तीची घोषणा नंदुरबार येथे पार पडलेल्या प्रदेश तेली महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा झाली. त्याचवेळी प्रशांत सुरळकर यांच्या सामाजिक कार्य, तरुणांशी असलेला संपर्क आणि संघटन कौशल्य यांचा विचार करून, त्यांची युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीने संपूर्ण नाशिक विभागात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रशांत सुरळकर हे समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रीय असून, त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये आपले योगदान दिले आहे. त्यांचे नेतृत्व मिळाल्याने तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे तेली समाजाच्या तळागाळातील घटकाला संधी मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, विक्रांत चांदवडकर, प्रियाताई महिंद्रे (धरणगाव), माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, श्यामकांत ईशी आणि अनेक मान्यवरांनी प्रशांत सुरळकर यांचे अभिनंदन केले. समाजाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व फलदायी ठरेल, असा विश्वास या वेळी सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आला.



