नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या महाभारतासाठी भाजपाकडून निवडणूक रणनीतीकार आणि जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी भाजपाच्या सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारी प्रिती गांधी यांनी प्रशांत किशोर यांना जबाबदार ठरवले आहे.
प्रशांत किशोर यांनी डुबवले, असे ट्विट प्रिती गांधी यांनी केले आहे. तर दुसरीकडे जदयूचे बंडखोर नेते अजय आलोक यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’मुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपासून शिवसेना एका रणनीतीकाराकडून ज्ञान घेत होती. परिणाम सगळ्यांसमोर आहे, अशा आशयाचे ट्विट अलोक यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी शिवसेनेसाठी रणनीती आखली होती. त्यामुळे त्यांच्यावर गंभीर आरोप भाजपकडून होत आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. तर प्रशांत किशोर यांनीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदा बाबत आग्रही राहण्याचे सांगितले. त्यामुळेच ५०-५० फॉर्म्युल्यांतर्गत सेनेकडून अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली अशी देखील चर्चा सुरू आहे. तर प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसारच सेनेने भाजपाशी फारकत घेतल्याचाही आरोप होत आहे.