मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आघाडी करत असल्याची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत चर्चा केली. यात प्रारंभी मविआकडे २७ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. तथापि, ही बोलणी शक्य झाली नाही. यानंतर सहा जागांवर शेवटची तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी याला देखील नकार दिला. यानंतर त्यांनी आज राज्यातील प्रमुख मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले. यातील लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आघाडी करत असल्याचे जाहीर केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आधीपासूनच मनोज जरांगे पाटील यांची पाठराखण केली होती. यानंतर त्यांनी आता थेट जरांगे यांच्या मदतीने राज्याच्या राजकारणात एक नवीन आघाडी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले आहे. दरम्यान, आज आंबेडकरांनी आपले काही उमेदवार जाहीर केले. यात प्रामुख्याने अकोला येथून स्वत: प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढविणार आहेत. यासोबत भंडारा-गोंदिया : संजय केवट; गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी; चंद्रपूर : राजेश बेले; बुलडाणा : वसंतराव मगर; अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान; वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबत सांगली येथून प्रकाश शेंडगे यांना तर रामटेकमधून कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.