बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अनेक महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले जेडीएसचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. मात्र बंगळुरू विमानतळावर दाखल होताच त्यांना एसआयटीने शुक्रवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या. प्रज्वल रेवन्ना जर्मनीहून बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर लगेच एसआयटीनं त्यांना अटक केली. यावेळी बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष तपास पथकाने मोठा फौजफाटा तैनात केला. प्रज्वल रेवन्ना यांना जर्मनीतील म्युनिकहून परतल्यानंतर लगेच त्यांना सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.
जेडीएसचे निलंबित नेते तथा खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर ते जर्मनीला गेले होते. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे भारतात परतले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांना विशेष तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आलं. खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध न्यायालयीन वॉरंट प्रलंबित होते. औपचारिकतेनंतर एसआयटीनं प्रज्वल रेवन्ना यांना अटक केलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बंगळुरूच्या विमानतळावर आल्यानंतर एसआयटीने प्रज्वल रेवन्ना यांना ताब्यात घेतले. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचं कथितरित्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षेमुळे लगेच दुसऱ्या मार्गानं एसआयटीने बाहेर काढले. प्रज्वल रेवन्ना यांनी 27 मे रोजी एक व्हिडिओ जारी करत आपण 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. प्रज्वल रेवन्ना हे 27 एप्रिलला जर्मनीला रवाना झाले होते. त्यानंतर सीबीआय मार्फत एसआयटीनं केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलनं प्रज्वल रेवन्ना यांच्याविषयीची माहिती मागणारी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली.