जळगाव प्रतिनिधी । प्रजापतनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये बंद फोडून हजार रूपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मात्र याबाबत अद्यापपर्यंत चोरीची नोंद करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापतनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये राहणारे धर्मेश भोजराज पांडव हे ऑटो आयकॉनमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. पांडव हे पत्नी कोमल, मुलगा हर्षल व मुलगी हेमा यांच्यासह राहतात. पांडव यांचे आई-वडील यावल तालुक्यातील म्हैसवाडी गावी राहतात. 16 रोजी रात्री त्यांच्या आई प्रभावती यांचे निधन झाल्याने शनिवारी सकाळी पांडव परिवारासह त्याठिकाणी गेले.
दोन कपाट फोडले
चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याची संधी साधत रात्रीच्या सुमारास घराच्या कंपाऊडमध्ये प्रवेश केला. खिडकीवर चढत चोरट्यांनी बाहेरील लाईट फोडला. त्यानंतर मुख्य दरवाज्याचा कडी कोंडा कापत आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट फोडून 1 हजार रूपये रोख लंपास केली. कपाटात गॅस हंडी घेण्यासाठी गॅसच्या पुस्तकात 500 रूपये ठेवलेले होते. सुदैवाने चोरट्यांच्या हाती ते पैसे लागले नाही.
गॅस हंडीवाल्याच्या लक्षात आला प्रकार
सोमवारी सकाळी 10 वाजता पांडव यांच्याकडे गॅस हंडी पोहचविण्यासाठी एजन्सीचा कर्मचारी आला होता. त्यावेळी समोर राहणार्या एका महिलेने पांडव गावी गेले असल्याचे सांगितले. परंतु गॅस एजन्सीच्या कर्मचार्याने घराचा दरवाजा उघडा असल्याचे निर्दशनास आणून दिले. त्यावेळी घरात जावून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. पांडव यांना याबाबत कळविण्यात आले असून ते आईच्या अंत्यविधीनंतरची सर्व कार्य आटोपल्यानंतर जळगावला येणार आहे.