जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कापसाला हमीभाव मिळावा, जळगाव जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच पिक पेरा ॲपमध्ये येणारी अडचण तातडीने दुर करावी यासह इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षाच्या हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, त्याला तातडीने हमीभाव देऊन १२ हजार रुपये प्रत्येक क्विंटल देण्यात यावा, दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारले असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात पिकांची परिस्थिती कठीण झाल्याने शेतातील पीक अक्षरशा जळत असल्याने हंगाम वाया गेला आहे, त्यामुळे जळगाव जिल्हा हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शिवाय शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणी ॲपवर पीक नोंद करायची असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांच्या नोंदी अपूर्ण आहेत तर काही जणांचे पीक पेरा लागलेला नाही त्यामुळे त्यांना विमा भेटण्यासाठी भविष्यात अडचणीचे ठरणार आहे. या प्रलंबित व विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, महानगराध्यक्ष प्रवीण पाटील, विधानक्षेत्र प्रमुख महिला निता राणे, पंकज पवार, जतीन पांड्या, विजय पाटील, नरेंद्र सपकाळे, नितीन सूर्यवंशी, युसुफ खान, रोहित कोठावदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.