नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार लोकसभेत करणे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलेच महागात पडले होते. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते, असे म्हणत साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान ‘डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले. ‘विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली’ हे राजा यांनी सभागृहात सांगितले. परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत ‘तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये’, असे म्हटले होते. यानंतर मात्र, सभागृहात एकच गोंधळ झाला होता. तसेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेधही केला होता. अखेर शुक्रवारी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याबाबत लोकसभेत माफी मागितली. दरम्यान, भाजपच्या संसदीय तसेच संरक्षण समितीतून प्रज्ञा ठाकूर यांना बाहेर काढण्यात आले आहे.