Home टेक्नोलॉजी  शक्तिशाली ‘NISAR’ उपग्रहाचं आज सायंकाळी होणार प्रक्षेपण 

 शक्तिशाली ‘NISAR’ उपग्रहाचं आज सायंकाळी होणार प्रक्षेपण 


श्रीहरिकोटा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। भारत आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. ISRO आणि NASA यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेल्या ‘NISAR’ या पृथ्वी निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या अद्वितीय आणि अत्याधुनिक उपग्रहाचं आज 30 जुलै रोजी यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात येईल. संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV-F16 रॉकेटद्वारे या उपग्रहाला अंतराळात सोडण्यात येईल व अवघ्या 18 मिनिटांत हा उपग्रह 743 किमी उंचीवरील कक्षेत स्थिरावेल.

‘NISAR’ हे NASA-ISRO Synthetic Aperture Radar या नावाचं संक्षिप्त रूप आहे. या उपग्रहाची रचना अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अत्यंत सूक्ष्म हालचालीही टिपण्याची क्षमता आहे. पाच वर्षांच्या या मोहिमेसाठी सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 12,500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा उपग्रह दर 97 मिनिटांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि अवघ्या 12 दिवसांत पृथ्वीच्या जवळजवळ प्रत्येक इंचाचा बारकाईने नकाशा तयार करेल.

निसारची खासियत म्हणजे तो ढग, अंधार, धूर किंवा घनदाट जंगलं अशा कोणत्याही अडथळ्यांमधूनही स्पष्टपणे निरीक्षण करू शकतो. यामुळे हवामान बदल, जमिनीवरील नैसर्गिक परिसंस्था, समुद्रातील हालचाली तसेच बर्फ वितळण्यासारख्या घटनांचा अचूक मागोवा घेणे शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, जमिनीचा खालच्या दिशेने होणारा झुकाव, शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका किंवा हिमनद्यांची गती ही महत्त्वाची निरीक्षणं निसारद्वारे शक्य होणार आहेत.

NISAR मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पृथ्वीच्या बदलत्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करणे. उपग्रहाचे प्राथमिक तीन निरीक्षण क्षेत्र म्हणजे – जमीन आणि बर्फ बदल, जमिनीवरील परिसंस्था आणि सागरी क्षेत्र. या डेटाचा उपयोग करून शास्त्रज्ञ हवामान बदलाचा प्रभाव, नैसर्गिक आपत्तींची शक्यता आणि पर्यावरणातील सूक्ष्म हालचालींचा अंदाज वर्तवू शकतील. विशेष बाब म्हणजे निसार उपग्रहाने गोळा केलेला डेटा पूर्णपणे ‘ओपन-सोर्स’ असणार आहे, ज्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि सरकारांना तो मोफत उपलब्ध होईल.

पारंपारिक उपग्रहांच्या तुलनेत निसारचे वैशिष्ट्य हे आहे की तो प्रत्येक ऋतूमध्ये, कोणत्याही प्रकाशस्थितीत आणि हवामानात देखील अत्यंत उच्च-गुणवत्तेचे निरीक्षण करू शकतो. त्याच्या द्वारे पृथ्वीवरील अगदी सूक्ष्म हालचालीही जवळपास रिअल-टाइममध्ये टिपल्या जातील. त्यामुळे जमिनीवरील बदल, पर्यावरणीय संकट आणि इतर नैसर्गिक घडामोडींचा वेळीच अंदाज घेता येईल.

या ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे भारताच्या आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधनात एक नवा मैलाचा दगड ठरला आहे. ISRO आणि NASA या दोन्ही संस्थांची ही संयुक्त कामगिरी केवळ विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीच नव्हे तर जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


Protected Content

Play sound