जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पारंपारिक कुंभार समाजाला मातीकाम व वीट कामासाठी माती वाहतुकीची परवानगी मिळावी, यासाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार समाज हे मातीपासून माठ, दीपक, वीट बनविण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाहक करत आहे. शासनाच्या निर्णयानुसार गाळ मातीसाठी रॉयल्टीतून कायमस्वरूपी सूट देण्यात आलेले आहे. परंतु 22 मे 2019 च्या राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कोणतेही उत्खनन करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी शिवाय शासकीय स्तरावर परवानगी मिळणे बंद केले. परंतु भारतीय राजपत्र परिशिष्टानुसार पर्यावरण मंजुरीत कुंभार समाज उदरनिर्वाहासाठी लागणारी चिकन माती व इतर मातीची उत्खनन करण्यास पर्यावरणाच्या मंजुरीतून वगळण्यात आलेले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १४ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानुसार शासनाचे पत्र रद्द करून तात्पुरते गौण खनिजाचे तात्पुरते परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील वडार समाजाला पारंपारिक उपजीविकेचे साधन म्हणून माती उत्खनन करण्यास परवानगी मिळाली त्याच धर्तीवर कुंभार बांधवांना देखील राज्य शासनाने माती उत्खनन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे, या निवेदनावर कुंभार समाजाचे संघटनेचे जिल्हा सचिव सखाराम मोरे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, सुभाष पंडित, विलास कुंभार, अशोक पंडित, देविदास कुंभार, घनश्याम हरणकर, संतोष काकडे, विजय पंडित, मनोज कापडे यांच्यासह कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.