यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील आयशानगर परिसरात गेल्या सात महिन्यांपासून उघडे ठेवले गेलेले खड्डे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. यावल नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर अनेक वेळा अपघात झाले असून, स्थानिकांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावल-भुसावळ या महत्त्वाच्या राज्य मार्गालगत असलेल्या फालक नगर परिसरातील आयशानगर कॉलनीच्या वळणावर, पराग बोरोले यांच्या घरासमोर नगर परिषद प्रशासनाने गटारी स्वच्छ करण्याच्या नावाखाली दोन मोठे खड्डे सात ते आठ महिन्यांपूर्वी खोदले होते. मात्र, या खड्ड्यांची आजतागायत कोणतीही दुरुस्ती न झाल्याने वळणाच्या ठिकाणी दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होत आहेत. हे खड्डे अतिशय धोकादायक ठिकाणी असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, त्यांनी नगर परिषदेवर अक्षम्य दुर्लक्षाचा आरोप केला आहे. त्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना सांगितले की, “या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने तातडीने या खड्ड्यांची डागडुजी करून नागरिकांच्या जीवाची काळजी घ्यावी.” त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात त्वरित आदेश देण्याची मागणी केली असून, पुढील दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास मुख्याधिकारी निशिकांत गवई यांची भेट घेऊन याबाबत ठोस पाठपुरावा करण्याचा इशाराही दिला आहे.
सात महिन्यांपासून रस्त्यावर कायमस्वरूपी असलेले हे खड्डे केवळ नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेला धोका ठरत नाहीत, तर नगर परिषदेच्या हलगर्जी कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. स्थानिक रहिवाशांसह राजकीय प्रतिनिधींनी देखील आता या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.



