जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या भित्तीपत्रक स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य” या विषयावर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तीपत्रकांमधून शिवचरित्रातील शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडले.
विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तीपत्रकांमधून महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि जनतेप्रती असलेले कर्तव्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र दादा नन्नवरे, वित्त व लेखा अधिकारी रविंद्र पाटील, विचारधारा प्रशाळेचे संचालक डॉ. म. सु. पगारे, छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. अजय पाटील यांच्यासह प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना प्रथम क्रमांक विद्या सोनवणे यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक इशिका गुप्ता यांनी मिळवला. तृतीय क्रमांक श्वेता जैन आणि कंचन शेलटे यांनी संयुक्तपणे प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. तुषार रायसिंग आणि डॉ. नारसिंग परदेशी यांनी काम पाहिले, तर समन्वयक म्हणून प्रा. मोईन शेख यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर निर्माण होऊन राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



