चाळीसगावात ब्रेक दि चेनला सकारात्मक प्रतिसाद !

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेत आठवड्यातील दोन दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आदेश दिल्याने चाळीसगावात पहिल्या दिवशी शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दि.५ एप्रिल रोजी राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यात आठवड्यातील शनिवार व रविवार या दोन दिवशी कडक निर्बंध लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्बंध दि. ५ ते ३० एप्रिल दरम्यान राज्यात लागू असणार आहे. मिनी लॉकडाऊनचा चाळीसगावात पहिला दिवस असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच छोटे-मोठे व्यवसाय बंद पहायला मिळाले. त्यामुळे निर्बंधांमुळे कोरोना आटोक्यात येईल असे संकेत काही प्रमाणात दिसू लागले आहेत. शहरातील सिग्नल चौक, रेल्वे स्थानक, हिरापूर रोड, भडगाव रोड,  खरजाई नाका, घाट रोड व मालेगाव रोड शुकशुकाट होता. जास्त वाहनांची वर्दळ पहायला मिळाली नाही. मोबाईलची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गणेश कॉम्प्लेक्स येथे ही पुर्ण दुकाने बंद ठेवण्यात आल्या. पोलिस प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमामुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Protected Content