
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील प्रमुख यावल-भुसावळ राज्य मार्ग सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, या मार्गाची तात्काळ आणि कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.

भुसावळ पॉईंट ते जुना भुसावळ नाका, महाराष्ट्र ढाबा ते राजोरा फाटा आणि पाटचारी ते अंजाळे गावापर्यंतच्या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून खालावलेली आहे. यावल शहरातून जाणारा हा सुमारे १८ किमीचा राज्य मार्ग नागरिकांच्या दैनंदिन वापरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातील जवळपास ९ ते १० किमी रस्त्यावर मधोमध मोठमोठे खड्डे पडलेले असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना अपघातांचा धोका निर्माण होत आहे.
विशेषतः महाराष्ट्र ढाबा ते राजोरा फाटा हा सुमारे सहा किमीचा भाग आणि शहरातील भुसावळ पॉईंट ते जुना भुसावळ नाका हा दोन किमीचा भाग अत्यंत धोकादायक बनला आहे. दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सतत झटके सहन करावे लागत असून, काही ठिकाणी वाहने थेट खड्ड्यांमध्ये अडकून अपघातही होत आहेत.
या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, त्यांनी वेळोवेळी पॅचवर्कद्वारे केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्याने काहीच फरक पडलेला नाही. पावसाचे पाणी साचून अधिकच मोठे खड्डे तयार होत आहेत. यामुळे रस्त्याच्या सध्याच्या अवस्थेवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यावल तालुका अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी रस्त्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यांनी रावेर-यावलचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांची लवकरच भेट घेऊन संपूर्ण माहिती सादर करण्याचे व गुणवत्तापूर्ण रस्तादुरुस्तीची मागणी करण्याचे जाहीर केले आहे.
या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन संपूर्ण रस्ता नव्याने व दर्जेदार पद्धतीने तयार करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. नागरिकांमध्येही प्रशासनाबद्दल नाराजी वाढत चालली आहे.



