रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर ते पाल दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रावेर ते पाल या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. शासकीय तसेच खाजगी कामांसाठी ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी आणि युवक या रस्त्यावर अवलंबून आहेत. मात्र, रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा वाहनांचे नुकसान होत असून, लहान-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडत आहेत.

या रस्त्याचे महत्त्व अधिक असल्याचे कारण म्हणजे हा मार्ग आदिवासी भागांना शहराशी जोडणारा प्रमुख दुवा आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यावश्यक ठरतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पावसाळा जवळ येत असताना परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच खड्ड्यांमुळे प्रवास कठीण झाला असताना पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतः चिखलमय आणि धोकादायक होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच स्थानिक आमदार अमोल जावळे यांनीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे



