नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानास सकाळी सात वाजेपासून प्रारंभ झाला असून यात सात राज्यांमधील ५१ जागांचा समावेश आहे.
आज मध्यप्रदेश, युपी, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थानसह सात राज्यांमधील ५१ जागांसाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड आदींसह अन्य नेत्यांचा समावेश आहे. आज सकाळपासूनच यातील अनेक मतदारसंघांत मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे. या टप्प्यात ६७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ८.७५ कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. दरम्यान, या टप्प्यातील ५१ पैकी ३८ जागांवर भाजपचे खासदार असल्याने सत्ताधार्यांसाठी या जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.