भडगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघा अंतर्गत 18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 107 भडगाव येथे आज 48.44 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने 03-जळगाव लोकसभा मतदार संघाअंतर्गत 18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 107-भडगाव या ठिकाणी फेरमतदान घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या मतदान केंद्रावर आज फेरमतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांतर्गत पुरुष मतदार 690, स्त्री मतदार 652 असे एकूण 1342 मतदार होते. यापैकी 354 पुरुष मतदार, 296 स्त्री मतदार असे एकूण 650 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी 48.44 टक्के आहे.
आज सकाळी 6 वाजता मॉकपोल घेण्यात आला. त्यानंतर सकाळी 7 वाजता मतदानास सुरवात झाली. मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदानास सुरवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान झाले. यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत 21.24 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 28.46 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 34.58 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 43.82 आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 48.44 टक्के मतदान झाले असल्याची माहिती 18- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.