पक्षबदल राजकारणाला लागलेली कीड, पण कार्यकर्त्यांचे काय ?

 

 

 

 

protest clipart worker strike 12

अमळनेर (ईश्वर महाजन)
भारतात तीन विषय म्हणजे साक्षात झिंग असते. क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण. गल्ली ते दिल्ली आपला पक्ष म्हणजे आपला धर्म समजणाऱ्या जमातीवर नेत्यांची संस्थाने उभी राहतात अन टिकतात. संस्थाने उभी करणारी पुढे प्रस्थापित म्हणून लोकसंमत होतात अन लोकशाहीच्या मूकसंमतीने पाच वर्षाचा थांबा घेणारे राजे बनतात. बाकी लोककल्याण व लोकविश्वास राजेशाहीत जेवढा अबाधित होता तेवढा लोकशाहीत दिसत नाही, यावर दुमत नाही . यामागची खुट्टी म्हणजे त्या त्या नेत्याच्या मागे धावणारा कार्यकर्ता . साहेब म्हणतील तसे करणारा तो फाटका मोडून पडला तरी हटत नाही. नेते आपल्या बंगल्यावर असतात अन कार्यकर्ता कोर्टाच्या चकरा मारत गावकी रेटत असतो. सत्तेचे गणित जुळले नाही तर नेता रात्रीतून पक्ष बदलतो मात्र कार्यकर्ता साहेबांचा नेक बनून तसाच एकाच ड्रेसवर दांडा पकडून झेंडा उंचावत असतो. म्हणून राजकीय परिघात निष्ठेचे वाण फक्त कार्यकर्त्याच्या पदरी असते अन नेते मात्र दर पाच वर्षाला पदर बदलत असतील तरी चालते. निष्ठेचा बोळा फक्त कार्यकर्त्याच्या तोंडात का ? त्याने देखील अर्थपूर्ण अदला बदली का करू नये ? कारण सत्तेच्या बुडाला स्थिर असलेल्या कार्यकर्त्याने आपल्या बेंबीच्या देठाचा मोबदला घेतला पाहिजे अन आपल्या पाठीत देखील कणा असल्याची जाणीव जगाला अन स्वत:ला करून दिली पाहिजे .

कोपरापर्यंत वगळ आलेले नेते रात्रीतून पक्ष बदलतात खालच्याच भाषेत उरकायचे झाले तर ज्या घोड्यावर बसून गुलाल घेतात त्याच घोड्याला घोडा दाखवतात. कार्यकर्त्याच्या जोरावर सत्ता मिळवणारे नेते सोयीने पक्ष बदलतात मात्र कार्यकर्ता पक्षाच्या विचाराशी आणि पक्षाच्या भूमिकेशी बांधील राहत सत्ता असो नसो तिथेच राहतो. संसदेत २४ टक्के खासदार इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. याचा अर्थ भाजपच्या मतदारांनी मतदान केले ते पक्षाच्या विरोधात. आजवर लढलेल्या नेत्याला जर ते २४ टक्के चांगले प्रतिनिधी असतील तर ते सर्वकाळ असले पाहिजेत. ज्या वेळी पक्ष बदलून एखादा नेता दुसऱ्या पक्षात उमेदवार होतो तेव्हा त्यावेळी दोन प्रतारणा होतात. एक ज्या पक्षात प्रवेश होतो त्या पक्षातील निष्ठावंत लोकांची प्रतारणा आणि दुसरी म्हणजे ज्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्या पक्षीय कार्यकर्त्यांचा अवमान. नेत्यांनी आपल्या लाभासाठी अर्ध्या रात्रीत निर्णय घ्यायचे अन पाडापाडी करायची, कार्यकर्त्यांनी मात्र पिढ्यान पिढ्या एकमेकांचे तोंड पाहायचे नाही.

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ग्रामपंचायत सदस्य जरी व्हावेसे वाटत असेल तर त्याला कितीतरी वर्ष संघर्ष करावा लागतो आणि घराणेशाहीवाले डायरेक्ट आमदार, खासदार होतात. आजोबाबरोबर काम केलेले अनेक कार्यकर्ते नातवाच्या वयाच्या नेत्यामागे साहेब-साहेब करत फिरताना दिसतात. आपल्या देशात लोकशाही फक्त नावालाच आहे, बाकी गावापासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीने कब्जा केलेला आहे. कार्यकर्ते जोपर्यंत यांची तळी उचलतात, तोपर्यंत ते त्याला चांगले म्हणतात पण कार्यकर्ता पुढे जातोय असे वाटले की पंख कापायला तयार. मग त्यांना आपापसात लढायला लावायचे, एक दुसऱ्याशी भांडणे करायला लावायची, पुढे जाऊन पक्ष नेतृत्वाला खोटे-नाटे सांगून त्यांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी रडायचे हेच केले जाते. निष्ठा वैगरे फक्त खालच्यांनी जपायच्या वरच्यांचे जोपर्यंत भागते तोपर्यंत निष्ठा, नाही भागले की तिथून निसटा ! यांच्या निष्ठा दिवसात बदलतात.
बापापेक्षा जास्त नेत्याला मानणारे कार्यकर्ते आज कमी नाहीत. नेत्याच्या कुत्र्याला देखील आदराने पाहणारा त्याचे नाव कार्यकर्ता. आपल्या आई बापासाठी जेवढी तसदी त्याला नाही, तेवढे तो नेत्यासाठी करतो. मात्र एकदा तो नेता आपल्याबद्दल कधी तू जेवलास का रे ? एवढे तरी विचारतो का ? हे त्याने तपासून पाहिले पाहिजे. निवडणूक आल्यावर प्रचाराला तडका भरावा म्हणून कडीपत्त्यासारखा ज्याचा वापर होतो अन त्याला मात्र ते कळत नाही त्याचे नाव कार्यकर्ता. बापाला अरे कारे करणारा हा कार्यकर्ता नेत्याला साहेब, दादा, अण्णा, भैय्या करत बसतो.

आता तर कार्यकर्त्यात वेगळीच जमात फोफावत आहे, टी म्हणजे भक्त, गांजा पिवून झिंग चढावी तसे नुसते मान हलवणारा प्राणी जसा तसे भक्त नावाचे लोक आपला नेता म्हणजे मसीहा मानतात ! त्याला देवाचा बारावा अवतार समजून वागत असतात, तो करेल तेच उत्तम, बुद्धीप्रामाण्यवादी लोकांनादेखील ही व्याधी झाली. कुठलाही तार्किक विचार नाही, ना जिज्ञासा, ना चिकित्सा, सत्तेसाठी पिशाच्च बनलेल्या वृत्ती अन त्या वृत्तीच्या अधीन होऊन भक्ती करणारे कार्यकर्ते तर देशाला घातक ठरत आहेत, मात्र नेत्यांसाठी हे कार्यकर्तेच
सर्वाधिक सोयीचे भक्त ठरले आहेत. हे घरचे डीझेल घालून आपले इंजिन दिवसभर चालू ठेवतात. कधी फेसबुक कधी व्हाटसअँपवर
तर कधी चहा फुरकताना नेत्याची वाहवाह करतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि त्यातले अधिकार फक्त प्रस्थापितांच्या पोरांना नाहीत ते प्रत्येक भारतीय नागरिकांना आहेत. अंध नाही तर डोळस होऊन विचार करण्याची गरज आहे. खासदार त्यांचाच, आमदार त्यांचाच, मंत्री तेच, आमच्या लेकरांनी फक्त घोषणा, झेंडा, दारू, भांडण, केसेस, जामीन यासाठी जन्म घेतलाय का ? हा विचार करण्याची वेळ आलीय. नेत्याचे मागे चालले पाहिजे, मात्र आमच्यापेक्षा अधिक मूर्ख असणाऱ्या नेत्याच्या मागे धावण्याचे काही कारण नाही.

साठच्या दशकात नवनिर्मित महाराष्ट्राच्या राजकारणात विचार व कार्याने भारावून गेलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र फळी तयार झाली होती. स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडात झालेले केलेले संस्कार आणि नीतीमूल्यांची केलेली रुजवणूक याचा दृश्य परिणाम म्हणून वलयांकित झालेल्या नेत्या-कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपले भरीव असे योगदान दिलेले आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. राजकारण हा केवळ व्यवहार नसून, एक पवित्र असा सेवाभाव आहे, पर्यायाने ‘स्वार्थाच्या पलिकडे जाऊन नेतृत्वाला काही प्रयोजन असले पाहिजे’ या यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याला अनुसरून बहुतांश नेत्या कार्यकर्त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची वाटचाल निश्‍चित केली होती. ‘सर्व काही समयष्ठीसाठी’ असा ध्येयवाद उराशी बाळगून निष्ठावंत नेतृत्वाचा मूर्तीमंत आविष्कार उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला होता. दुर्दैवाने आज तसे नेतृत्व दिसत नाही म्हणून कार्यकर्त्यांनी देखील समयसूचक अशी कार्यप्रणाली अवलंबली पाहिजे.

Add Comment

Protected Content