Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपालिकेत राजकीय समीकरणे बदलली; भाजप–राष्ट्रवादी (अप) युतीमुळे विषय समित्यांवर दोन सभापतींची...

यावल नगरपालिकेत राजकीय समीकरणे बदलली; भाजप–राष्ट्रवादी (अप) युतीमुळे विषय समित्यांवर दोन सभापतींची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीदरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अपक्ष नगरसेवकांसह एकत्र येत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या अनपेक्षित एकत्रित भूमिकेमुळे विषय समित्यांच्या सभापतींची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली असून, या प्रक्रियेत भाजप–राष्ट्रवादी (अप) गटाला दोन सभापतीपदे मिळाली आहेत.

यावल नगरपालिकेच्या सभागृहात १९ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी भूषविले, तर मुख्याधिकारी निशीकांत गवई आणि सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी यावल शहराच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील, उपनगराध्यक्षा सईदा बी. याकुब शेख तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडी सत्ताधारी गटाला तीन विषय समित्यांचे सभापतीपद मिळाले असून, दुसरीकडे भाजपा व राष्ट्रवादी (अप) आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या एकत्र येण्यामुळे नगरसेवकांची संख्या समसमान झाली. त्यामुळे सर्व समित्यांच्या सभापतींची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली. या चिठ्ठीतून भाजप–राष्ट्रवादी (अप) गटाला दोन सभापतीपदे मिळाल्याने नगरपालिकेतील राजकीय समीकरणे अधिकच रंजक बनली आहेत.

दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील यांच्याकडे सहा पैकी चार सदस्यांचे बहुमत असल्याने या समितीवर त्यांचे वर्चस्व कायम राहणार आहे. उपनगराध्यक्षा सईदा बी. शेख यांची स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी इमाम खान समीर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी पराग विजय सराफ यांची, बांधकाम नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी (अप) चे अंजुम बी. कदीर खान यांची, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी (अप) च्या अमिनाबी शाकीर खान यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नगरपालिकेतील प्रशासनिक कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound