ठाणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। ठाणे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच युतीतील राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून, भाजपने थेट एकनाथ शिंदे गटाला इशारा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एकत्रितपणे निवडणूक लढवूनही योग्य मानसन्मान न मिळाल्यास भाजप विरोधी बाकांवर बसण्याचा विचार करू शकतो, असे स्पष्ट संकेत देण्यात आल्याने ठाण्याच्या सत्ताकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या १३१ जागांपैकी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटाला तब्बल ७५ जागांवर घसघशीत यश मिळाले असून, भाजपला अवघ्या २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फाटाफुटीचा फायदा भाजपला होईल, अशी चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात शिंदे गटाने ठाण्यात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसून आले.

निकालानंतर मात्र भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युतीत असूनही योग्य सन्मान आणि जबाबदाऱ्या मिळाल्या नाहीत, तर वेगळा विचार केला जाऊ शकतो. वेळ पडल्यास महापालिकेत विरोधी बाकांवर बसण्यासही भाजप मागेपुढे पाहणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. सत्तेवर अंकुश ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष दबाव दिला आहे.
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनीही आपली भूमिका मांडताना सांगितले की, निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपची जबाबदारी आहे. त्यासाठी योग्य भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यांमुळे भाजप आणि शिंदे गटातील युतीत अंतर्गत तणाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, शिंदे गटाला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्ता पूर्णपणे त्यांच्या हाती आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून उपमहापौरपद, सुधार समिती तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये वाटा मिळवण्यासाठी ‘प्रेशर टॅक्टिक्स’ वापरली जात असल्याची चर्चा आहे. भाजपने दिलेला विरोधी बाकांवर बसण्याचा इशारा केवळ दबावतंत्र आहे की खरोखरच युती तुटण्याच्या दिशेने पावले टाकली जातील, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.
जर भाजपने खरोखरच विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला, तर ठाणे महापालिकेत शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आगामी काळात ठाण्यातील सत्ताकारण अधिकच अस्थिर होण्याची चिन्हे दिसत असून, शिंदे गट भाजपच्या या इशाऱ्याला कशी प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



