पणजी (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने गोव्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. काँग्रेसने राज्यापालांना चिठ्ठी लिहून गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला असतानाच भाजपनेही नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीला मित्र पक्ष आणि काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. आता सोमवारी याबाबत पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपा सरकार देखील अडचणीत आले आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या काँग्रेसने शनिवारी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र देऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. पर्रिकर यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या गोटात सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींनी वेग धरला आहे. गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या पक्षांनी केवळ पर्रीकर यांच्यासाठीच सरकारला पाठिंबा दिला आहे. आता पर्रीकर यांच्या निधनामुळे हे पक्ष कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक होईल. पुढील महिन्यांत गोव्यात तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ४० जागांचे संख्याबळ आता ३६ वर आले आहे. पर्रीकर यांच्याजागी भाजपला नवा नेता निवडावा लागणार असून, त्यास इतर पक्षांचा पाठिंबा देणारे पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सादर करावे लागेल. जर या स्थितीत सिन्हा यांची खात्री पटली नाही तर मात्र त्या सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. दरम्यान,पर्रिकर आणि डिसोझा या दोन भाजपा आमदारांचे निधन तसेच दोघांचा राजीनामा यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. त्यात काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि मगोप यांचे प्रत्येकी तीन आमदार तसेच एक अपक्ष आमदार, राष्ट्रवादीचा एक आमदार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.