Home Cities जामनेर जामनेरमध्ये दोन महिला उमेदवारांच्या माघारीने राजकीय वातावरण तापले

जामनेरमध्ये दोन महिला उमेदवारांच्या माघारीने राजकीय वातावरण तापले

0
202

जामनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि पळवापळवीचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील तणाव दिवसेंदिवस तीव्र होत असताना, शिंदे गटासाठी आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. आधीच पक्षात नाराजीचे वारे वाहत असताना आता शिंदे गटाच्या दोन महिला उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

जामनेर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या वॉर्ड क्रमांक १ मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक १३ मधील रेशंता सोनवणे या दोघींनी शिंदे सेनेच्या एबी फॉर्मसह अर्ज भरले होते. मात्र, अचानक माघार घेत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या हालचालीमुळे शिंदे गटात मोठी घालमेल निर्माण झाली असून भाजपाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या घटनांमुळे नगरपरिषद निवडणुकीत समीकरणे बदलली असून भाजपचे दोन उमेदवार विनास्पर्धा निवडून आले आहेत. शिवसेना उमेदवारांच्या माघारीनंतर भाजपने त्यांना पक्षात घेतल्याने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला. “वरिष्ठ नेत्यांमध्ये सहमती होऊनही एकमेकांचे कार्यकर्ते पळवणे हा अयोग्य प्रकार असून तो रोखला गेला पाहिजे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत पवार यांनीही संताप व्यक्त केला.

महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमध्ये पळवापळवीचे राजकारण वाढल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवे वळण येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound