सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे. पक्षाच्या वतीने इच्छूक उमेदवारांची चाचपणी गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त पद्धतीने निवडले जाणार आहे, तर दहा प्रभागांमधून एकूण वीस नगरसेवक निवडले जातील. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तगड्या उमेदवारांची फळी उभी करण्यासाठी ही चाचपणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी इच्छूक उमेदवारांची भूमिका, त्यांचा जनसंपर्क आणि निवडणुकीच्या कामाची त्यांची तयारी जाणून घेण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

ही चाचपणी सावदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात (रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ) गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष कुशल जावळे आणि युवक शहराध्यक्ष अजय दगडू चौधरी यांनी केले आहे.
या चाचपणीच्या वेळी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे तसेच अल्पसंख्याक समाजाचे नेते व उद्योजक हारून शेठ यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत इच्छूक उमेदवारांचे सादरीकरण आणि त्यांची निवडणुकीची रणनीती तपासली जाईल. या उपक्रमामुळे सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी दिसून येत आहे.



