जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरातील रेल्वे पुलाजवळ सट्टा जुगार अड्ड्यावर आज दुपारी रामानंद नगर पोलीसांनी छापा टाकून दोन संशयितांवर कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातील रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. दरम्यान याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास पांडूरंग महाजन (वय-६५) रा. हरीविठ्ठल नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीविठ्ठल नगर रेल्वे पुलाजवळ आज दुपारी ३ वाजता काही व्यक्ती देखील जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यानुसार कर्मचारी संजय सपकाळे, विजय खैरे, प्रविण जगदाळे आणि उमेश पवार यांनी कारवाई करत सचिन बुधा भोई (वय-२०) रा. खंडेराव नगर, जळगाव आणि देविदास पांडूरंग महाजन (वय-६५) रा. हरीविठ्ठल नगर यांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळून अकराशे रूपयांची रोकड हस्तगत केले आहे. दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.