कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात हिंदुत्ववादी सरकार असतांनाही ‘लव्ह जिहाद’ सारख्या घटना घडत असून या प्रकरणांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
कोल्हापूर येथील एक अल्पवयीन मुलगी सुमारे १६ दिवसांपासून गायब झाली असून यात ‘लव्ह जिहाद’ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. पोलीस स्थानकाजवळ हा मोर्चा आल्यानंतर आमदार राणे यांनी आपल्या भाषणातून जोरदार हल्लाबोल केला.
आमदार नितेश राणे म्हणाले की, हिंदूंमध्ये एकी नसल्याने ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना घडत आहेत. खरं तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार असतांनाही हे प्रकार घडत असून यासाठी पोलिसांचे या प्रकाराला पाठबळ असल्यानेच हे शक्य होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर हिंदूंनी एकजुटीने रहायला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले.