१९ जूनपासून राज्यभरात पोलिस भरती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यभरात पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालकपदासाठी १९ जूनपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. हजारातील संख्येने असलेल्या पदांच्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृहातील मिळून ५२७ पदांसाठी एकत्रित ८६ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेदरम्यान, बनावट उमेदवार बसवण्यासारखा भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धत वापरण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागातीत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सोमवारी येथे दिली.

छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व रेल्वे विभागाने संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार बैठकीत भरतीच्या संदर्भाने माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील २१२ अंमलदार व ३१५ कारागृहातील पोलीस अंमलदारांच्या पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी अनुक्रमे १६ हजार १३३ व ७० हजार ३३३, असे एकत्रित ८६ हजार ४६६ अर्ज आले असून विभागीय क्रीडा संकुलावर चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली.

ग्रामीण पोलीस विभागातील १२६ व २१ अशा अनुक्रमे अंमलदार व चालकपदासाठी भरती होणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ४ हजार ४१८ व २ हजार ७२२ अर्ज आल्याचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले. रेल्वे विभागातील ८० पदांसाठी ३ हजार ४६६ पुरुष व ७६५ महिला उमेदवारांचे मिळून ४ हजार २२९ अर्ज आले आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक १४ येथे ८ ते ११ जुलैदरम्यान, भरती प्रक्रिया होणार असून शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

मैदानी चाचणीसाठी पावसाचा व्यत्यय आला तर त्या संबंधित उमेदवारांना पुढील आठ-पंधरा दिवसांच्या कालावधीतील तारीख देण्यात येईल. मात्र, त्यासाठी चाचणीशी संबंधित नोंदणीची कागदपत्रे त्याने स्वत:जवळ ठेवणे आवश्यक आहे. १९ ते २२ जूनपर्यंत अंमलदारपदांच्या उमेदवारांची तर २४ ते २६ चालकपदाची चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीसाठी ५० गुणांची परीक्षा होणार असून त्यामध्ये ५० टक्के मिळवणारे पात्र ठरतील. लेखी परीक्षा साधारण २८ जूननंतरपासून सुरू होईल. १०० गुणांची लेखी परीक्षा राहणार आहे. दोन पदांच्या चाचण्यांसाठी एकच तारीख आलेली असेल तर उमेदवारांना सूट देण्यात येईल. पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय व्यवस्थाही उमेदवारांसाठी राहणार आहे. ग्रामीण पोलीस विभागाची मैदानी चाचणी मुख्यालयामागील मुकुल मैदानात होणार आहे. तसेच सोळाशे व आठशे मीटर धावण्याची चाचणी शेंद्रा एमआयडीसीत होणार आहे. तेथे घेऊन उमेदवारांना जाणे-आणले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी सांगितले.

पोलीस किंवा अन्य तत्सम भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे कळताच काही बाह्य यंत्रणा कामाला लागतात. त्यांच्याकडून उमेदवारांना वेगवेगळी आमिषे दाखवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी फसवणूक करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके निर्माण केल्याची माहिती दिली.

Protected Content