Home क्राईम कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, दाम्पत्यासह तिघे अटकेत !

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, दाम्पत्यासह तिघे अटकेत !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथे भाड्याच्या घरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर रविवारी (१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालवणारे दिनेश संजय चौधरी (३५, रा. राधाकृष्ण नगर, दूध फेडरेशन) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) (४२, रा. देवेंद्र नगर, ह.मु. न्यू स्टेट बँक कॉलनी) यांच्यासह तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, न्यू स्टेट बँक कॉलनीमध्ये एक दाम्पत्य भाड्याने घर घेऊन कुंटणखाना चालवत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे आणि योगेश बारी यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले.

पोलिसांनी या कुंटणखान्यात डमी ग्राहक पाठवला. घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाची खात्री पटताच, डमी ग्राहकाने मिसकॉलद्वारे पोलिसांना इशारा दिला. त्यानुसार, सापळा रचून बसलेल्या पथकाने कुंटणखाना सुरू असलेल्या दोन मजली इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी घरमालक दिनेश चौधरी आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) यांच्यासह तीन तरुण सापडले. त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

तपासात असे समोर आले आहे की, कुंटणखाना चालवणारे हे दाम्पत्य पश्चिम बंगाल येथील एका तरुणीला जास्त पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी घरातून रोख रक्कम आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या कुंटणखान्यामुळे परिसरातील शांतता भंग पावली होती. याप्रकरणी दिनेश चौधरी आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ (भारती दिनेश चौधरी) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound