जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावात बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर साठवून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथे छापा टाकून तब्बल ५० भरलेले गॅस सिलिंडर, तीन रिकामे सिलिंडर, तसेच मोटार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. ८ फेब्रुवारीच्या रात्री ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी किरण भागवत पाटील (वय ५१, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅस सिलिंडर साठ्याचा मोठा स्फोटक साठा
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा साठा केला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण पाटील यांच्या घरावर छापा टाकला असता, तेथे व्यावसायिक व घरगुती वापरासाठीचे एकूण ५० भरलेले सिलिंडर सापडले. यामध्ये २९ व्यावसायिक व २१ घरगुती सिलिंडर होते. याशिवाय तीन रिकामे सिलिंडर देखील मिळून आले.
यासोबतच पोलिसांनी घटनास्थळी प्रेशर मोटर, चार फुटाचे पाईप, लोखंडी सॉकेट, इलेक्ट्रॉनिक पंप, वजन काटा असा एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व साहित्य बेकायदेशीर गॅस भरण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस नाईक योगेश घुगे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून किरण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.