Home क्राईम अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्या अड्ड्यावर पोलीसांची धाड ; दोघांवर कारवाई

अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्या अड्ड्यावर पोलीसांची धाड ; दोघांवर कारवाई

0
151

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात अनधिकृतरीत्या घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या आणि जीवघेणा रिफिलिंगचा उद्योग चालवणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता ‘सर्च ऑपरेशन’ राबवून मोठी कारवाई केली आहे. पिंप्राळा हुडको सारख्या दाट लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने एकाच वेळी दोन ठिकाणी छापे टाकून गॅस माफियांचे कंबरडे मोडले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई पिंप्राळा हुडको परिसरात काही संशयित व्यक्ती घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस काढून त्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक नितीन गणापुरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वत: पथकासह बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पिंप्राळा परिसरात दोन ठिकाणी जावून कारवाई केली.

पोलिसांनी नियोजनबद्ध रितीने या भागातील दोन संशयास्पद ठिकाणांची घेराबंदी केली. पहिल्या छाप्यात पोलिसांना ५ गॅस सिलिंडर आणि १ इलेक्ट्रिक रिफिलिंग पंप मिळून आला. मात्र, पोलीस इथेच थांबले नाहीत; दुसऱ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत ७ गॅस सिलेंडर आणि आणखी १ पंप असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण १२ गॅस सिलिंडर, २ इलेक्ट्रिक पंप आणि अचूक वजनासाठी वापरले जाणारे २ वजन काटे जप्त केले आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव, रविंद्र मोतिराया आणि अमोल ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound