Home Cities एरंडोल  जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रोख रकमेसह ५ जुगारी ताब्यात

 जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रोख रकमेसह ५ जुगारी ताब्यात

0
246

कासोदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील उत्राण शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे केली. या प्रकरणात एक जुगारी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

कासोदा गावाला लागून असलेल्या उत्राण शिवारातील शंकर रामदास चौधरी यांच्या शेतात काही इसम पैसे लावून पत्त्याचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोहेकॉ श्रीकांत गायकवाड, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ दीपक देसले यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. शेताजवळील रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करून काही इसम जमिनीवर बसून पत्त्याचा खेळ खेळत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान पाच जुगारींना ताब्यात घेण्यात आले. पकडण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये रामचंद्र दगडू कोळी (वय ३०), हेमंत राजू भोई (वय २५), नारायण सुरेश चौधरी (वय ३३), गोरख धर्मा गोकुळ (वय ४०) हे सर्व राहिवासी उत्राण, तालुका एरंडोल यांचा समावेश आहे. तर उत्तम धनराळे हा आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळी रोख रक्कम ५,९५० रुपये, १०,००० रुपये किमतीचा मोबाईल, व ४५,००० रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ६१,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत आणि त्यांच्या पथकाने केली.

कासोदा पोलिसांनी वेळेवर आणि तडफेने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात जुगार अड्ड्यांविरोधातील पोलिसांची सक्रियता दिसून आली असून स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound