धनाजी नाना महाविद्यालयात पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग-युवतीसभा अंतर्गत आयोजित “पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचा” समारोप आज संपन्न झाला. या समारोप समारंभाचे प्रमुख वक्ते डॉ. एस. ए. पाटील यांनी सैन्य दलात विविध वनस्पतींचा उपयोग कसा होतो याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. पाटील यांनी अग्निवीर योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ही योजना केवळ सैनिकच घडवत नाही तर तरुणांना कणखर आणि शिस्तप्रिय बनवून जबाबदार नागरिक घडवते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, प्रा. अचल भोगे, डॉ. जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले.

 

पहिला दिवस: औरंगाबाद येथील सैनिक अधिकारी कर्नल अनुज सिंग यांनी अग्निवीर भरती प्रक्रिया आणि सैनिकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या.
दुसरा दिवस: मेजर स्मिता चौधरी यांनी पोलीस व अग्निवीर भरतीसाठी तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले.
तिसरा दिवस: माजी बीएसएफ अधिकारी युवराज गाढे यांनी परेड ड्रिल्स व शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.
चौथा दिवस: महाराष्ट्र अठरा बटालियन जळगावचे सुभेदार अमोल साळुंखे यांनी भरतीनंतरच्या सैन्य जीवनाचा अनुभव सांगितला.
पाचवा दिवस: विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूरचे संचालक आकाश तायडे यांनी स्पर्धा परीक्षांविषयी सखोल माहिती दिली.
सहावा दिवस: डॉ. एस. ए. पाटील यांनी सैन्यात वनस्पतींच्या उपयोगाविषयी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले. जान्हवी जंगले, समीर तडवी आणि साक्षी सरोदे यांनी सैन्य दलाविषयी जाणीव निर्माण होत असतानाच स्वतःतील उणीवांवरही काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

कार्यशाळा संयोजक डॉ. विजय सोनजे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मगर यांनी तर आभार प्रदर्शन अचल भोगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिवाजी मगर, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, ओमसिंग राजपूत, ईश्वर चौधरी, दिगंबर भंगाळे, सागर ठाकूर आणि शिक्षक-विधी कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content