Home क्राईम आयशरच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी, सरकारी वाहनाचेही नुकसान

आयशरच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी, सरकारी वाहनाचेही नुकसान


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शासकीय वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी जखमी झाले असून शासकीय वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हायवेवरील ‘प्रेमाचा चहा’ हॉटेलसमोर ही घटना घडली. वरणगाव पोलीस स्टेशनचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इस्माईल इब्राहीम शेख (वय ५६ वर्षे) हे आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय वाहनाने (क्र. MH-19-CZ-8592) गस्तीवर असताना, त्यांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते.

यावेळी आयशर ट्रक (क्र. MH-40-CD-5971) चा चालक मोहम्मद तालिब खान मोहम्मद सईद (वय २८, रा. गाजीखान बंदुकला, सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याने उभ्या असलेल्या पोलीस वाहनास उजव्या बाजूने जोरात धडक दिली. या धडकेमुळे फिर्यादी मोहम्मद शेख यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून, शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound