Home Cities धरणगाव धरणगावातील पोलीस पाटलांचा स्नेहमेळावा चर्चेत; अतिवृष्टीग्रस्तांना सोडून ‘बोरवेल शांतता पूजेत’ अधिकारी दंग

धरणगावातील पोलीस पाटलांचा स्नेहमेळावा चर्चेत; अतिवृष्टीग्रस्तांना सोडून ‘बोरवेल शांतता पूजेत’ अधिकारी दंग


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुका पोलीस पाटील संघटनेने आयोजित केलेला स्नेह मेळावा आणि निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार हा कार्यक्रम सध्या शहरात आणि तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने धरणगाव पोलीस स्टेशनमधील बोरवेलच्या ‘शांतता पूजेचा’ झालेला विशेष समारंभ आणि त्याला उपस्थित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी धरणगाव पोलीस ठाण्यात बोरवेल लावण्यात आला होता, मात्र त्याचे उद्घाटन आणि ‘शांतता पूजा’ बाकी होती. त्यासाठी पोलीस पाटील संघटनेने स्नेह मेळावा आणि निवृत्त पोलीस पाटलांच्या जेवणाच्या आयोजनासोबतच ही पूजा उरकून घेतली. या कार्यक्रमाला विभागीय दंडाधिकारी (प्रांत) मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सुनील पवार, जळगाव वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्यासह उपनिरीक्षक आणि जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कर्तव्याकडे दुर्लक्ष?

विशेष म्हणजे, एकीकडे अतिवृष्टीमुळे धरणगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि पंचनाम्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत महसूल आणि पोलीस प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी बोरवेलच्या शांतता पूजेत आणि स्नेह मेळाव्यात आपला वेळ देत असल्याचे चित्र दिसले. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे प्रतिनिधी असलेले पोलीस पाटील हे गावातील शांतता आणि एकूण हालचालींवर लक्ष ठेवणारे महत्त्वाचे पद आहे. मात्र, मेळाव्यात उपस्थित काही पोलीस पाटलांना आपल्या कार्यक्षेत्रातील अतिवृष्टी नुकसानीची नेमकी माहिती विचारली असता, त्यांना ती देता आली नाही. आपल्या पदाचे मूळ कार्य आणि जबाबदारीचा त्यांना विसर पडल्याचे यावरून दिसून आले.

एका बाजूला पोलीस पाटलांच्या मानधन वाढीसाठी आंदोलने होतात आणि दुसऱ्या बाजूला शासन म्हणून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडताना दिसत असताना, उपस्थित अधिकाऱ्यांनी व पोलीस पाटील संघटनेने नेमकी कोणत्या कामाला प्राधान्य दिले, हा प्रश्न धरणगाव तालुक्यात विचारला जात आहे. एकविसाव्या शतकात जग पुढे जात असताना पोलीस स्टेशनमधील ‘बोरवेल शांती पूजा’ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे प्रशासनाच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


Protected Content

Play sound