अलिबाग (वृत्तसंस्था) डय़ुटी लावण्याच्या रागातून हजेरी मास्तरवर पिस्तुलाची बट मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. मंगेश निगडे असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हजेरी मास्तर मंगेश निगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांना कैदी पार्टी डय़ुटी लागल्याबाबत कळविले होते. याबाबत डोक्यात राग घेऊन आलेले जाधव यांनी निगडे यांना शिवीगाळ करून आपल्याजवळील पिस्तूल काढून त्यात गोळ्या भरून तुला आता गोळ्याच घालतो असे सांगून त्यांच्या अंगावर धरले. मंगेश निगडे यांनी प्रसंगावधान राखून सदर रोखलेली पिस्तूल हाताने धरून जाधव यांना प्रतिकार केला. मात्र जाधव यांनी निगडे यांच्या डोक्यात पिस्तूलच्या बटने तीन ठिकाणी मारून जखमी करून रक्तबंबाळ केले. निगडे रक्तबंबाळ अवस्थेत कसेबसे तेथून पळून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना जाऊन भेटले व सदर झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कोणताही गुन्हा दाखल नसून या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.