जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील दुमजली इमारतीच्या वरच्या घरातून चोरट्याने पर्स व मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात साईदास भगवान राठोड याला अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या संदीप रमेश सोनवणे (वय २७) यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर प्रवेश करून चोरट्याने पर्स लांबवली होती. या पर्समध्ये सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. तसेच याच भागात राहणाऱ्या अक्षय सतनसिंग राजपूत व सुरेश बाबुराव मोरे या दोघांचेही मोबाइल चोरीस गेले होते. ही घटना २८ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी साईदास भगवान राठोड (वय १८, रा.मंगलपुरी, मेहरूण) याला अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन मोबाइल व काही दागिने पोलिसांनी जप्त करण्यात आले होते. आज न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी साईदास राठोड याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.