पुणे । येत्या 31 डिसेंबरला पुण्यात होऊ घातलेल्या एल्गार परिषदेला स्वारगेट पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे कारण देत पुणे पोलिसांकडून या परिषदेला परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे.
३१ डिसेंबरला होणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार नाही असं वाटत होतं. मात्र त्याचवेळी ही परिषद होईल अशी घोषणा करण्यात आली होती. तसंच यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती. मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
दरम्यान यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.