पाच हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यासह पंटरला पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेळी पालनासाठी दुसऱ्या टप्प्यांतील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्याच्या मोबदल्यासाठी ५ हजाराची लाचेची रक्कम स्विकारतांना महाबळ परिसरातील वसंतराव नाईक भटके विमुक्ती जाती महामंडळ विभागाचे जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक (वय-५५ ) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवार (वय-३२) यांना जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अटक होती.  याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील बोरावल येथील तक्रारदार यांनी  जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे शेळी पालनासाठी १ लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले. त्यापैकी पहिला हप्ता ७५ हजार रुपयांचा मंजूर झाला व उर्वरीत २५ हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक यांनी स्वतःसाठी ३ हजार व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल यांच्यासाठी २ हजारांची लाच सोमवारी ४ सप्टेंबर रेाजी  मागितली होती.  मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वापता कार्यालयातच जळगाव लाचलुचपत विभगाच्या पथकाने संशयितांना लाच घेतांना अटक केली होती. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अटकेतील दोघांना जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश जे.जे. मोहित यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे करीत आहे.

Protected Content