
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पारोळा शहरात नायलॉन मांजाच्या विक्री व साठवणुकीविरोधात पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, या कारवाईत एका तरुण विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे आठ बंडल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे पक्षीप्रेमी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

शहरात नायलॉन मांजा सर्रास विक्री केला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. या पार्श्वभूमीवर पारोळा पोलिसांनी विशेष गस्त व धडक मोहीम सुरू केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पाठक गल्ली परिसरातील एका घरावर छापा टाकला. ही कारवाई हवालदार सुनील पवार, सुनील पाटील, प्रवीण बोरसे आदी गस्त घालत असताना करण्यात आली.
छाप्यात ज्ञानेश्वर एकनाथ भोई (वय १९) हा तरुण नायलॉन मांजा विक्री करताना व साठवणूक करताना आढळून आला. त्याच्याकडून एकूण २,४०० रुपयांचे आठ नायलॉन मांजाचे बंडल जप्त करण्यात आले. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नायलॉन मांजा हा मानवी जीवनासाठी तसेच पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असल्याने शासनाने यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. तरीही सणासुदीच्या काळात त्याची गुप्तपणे विक्री केली जाते, अशी नागरिकांची तक्रार होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शहरात नायलॉन मांजावर नियंत्रण येईल, तसेच पक्षी व नागरिकांच्या सुरक्षेला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिक व पक्षीप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.



