Home प्रशासन भुसावळात पोलिसांची जनजागृती रॅली ; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन 

भुसावळात पोलिसांची जनजागृती रॅली ; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत आठवडे बाजार परिसरात ही रॅली काढण्यात आली असून नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या रॅलीत पोलिस कर्मचारी आणि एनसीसी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांपर्यंत महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवला. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी रॅलीचे नेतृत्व केले.

रॅलीदरम्यान नागरिकांना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या चोरीच्या घटनांबाबत जागरूक करण्यात आले. विशेषतः मोबाईल फोन मागील खिशात ठेवू नये, गर्दीच्या ठिकाणी सावध राहावे, तसेच अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. चोरी अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचेही नागरिकांना सांगण्यात आले.

या उपक्रमात गोपनीय विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन सपकाळे, अन्य पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीदरम्यान विविध फलक आणि घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली.


Previous articleडॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound