जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा बाजारपट्ट्यातून दुचाकी लांबविल्याची घटना घडली होती. दरम्यान, दुचाकी चोरटा हा याच परिसरातील एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी आला. त्याने चोरलेली दुचाकी हॉटेलबाहेर लावली. चोरटा घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ येताच पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
शहरातील चंदुअण्णानगरातील रहिवासी धनराज लंजी पाटील हे खासगी नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांची (एमएच १९ सीजी १२४९ ) क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी दि. २१ डिसेंबर रोजी पिंप्राळा बाजारपट्टा येथे हॉटेल आदर्शजवळून अज्ञात चोरट्याने लांबविली होती. त्यांनी संपूर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दारु पिवून येताच आवळल्या मुसक्या
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुशिल चौधरी व अजित पाटील हे गस्तीवर असतांना त्यांना याच परिसरातून चोरी गेलेली दुचाकी एका हॉटेलबाहेर लावलेली दिसून आली. त्यांनी काही वेळ याठिकाणी थांबले असता, त्यांना किशोर दत्तात्रय चौधरी (वय-४२, रा. विद्या कॉलनी) ती दुचाकी घेवून जात असल्याचे दिसताच त्यांनी चोरट्याच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.