गुटखा कारखान्यावर पोलिसांची कारवाई; ३ कोटीचा मुद्देमाल जप्त

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने राज्यात गुटखा बंदी केली असून गुटखा विक्री व उत्पादनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही राजरोजसपणे गुटखा विक्री होते, अन्न व औषध विभागातील अधिकारी आणि पोलिसांकडून काही ठिकाणी कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा पोलिसांची ही कारवाई तोंडदेखलेपणाचीच असल्याचे दिसून येते. मात्र, आता लातूर एमआयडीसीमध्ये गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.

याठिकाणी मोठे साहित्य जप्त केले आहे. अतिरिक्त एमआयडीसी लातूर या भागातील एका गोदामामध्ये गोवा गुटखा बनवण्याचा कारखाना उघड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या ठिकाणी गोवा गुटखा बनवण्याचे यंत्र, इतर कच्चा माल आणि वाहने असा एकूण तीन कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हादाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी लातूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Protected Content