बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या १५ जणांवर पोलिसांची कारवाई

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथे बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या १५ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गणित विषयाचा पेपरला बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जमा झाले होते. पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

राज्य सरकारने यावर्षी कॉपीमुक्त अभियानावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रयत्नशील आहेत. विशेषतः उपद्रवी केंद्रांवर प्रशासनाने अधिक लक्ष ठेवले आहे. शनिवारी सकाळी ११ ते २ या वेळेत बारावीचा गणिताचा पेपर होता. या पेपरला बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जमा झाले होते. त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, सुनील हटकर, योगेश शिंदे, भोई आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जणांना पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात काही तरुणांचा समावेश आहे. या सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना ताकीद देऊन दुपारी दोन नंतर सोडून देण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परीक्षा केंद्रात बाहेर कमालीची शांतता दिसून आली. तर कॉपी पुरवणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे परीक्षा केंद्र सुरळीत पार पडली.

Protected Content