भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अन्नातून भीषण विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संस्थेच्या ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये जेवण केल्यानंतर मंगळवारी ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री साधारण २ वाजेच्या सुमारास २०० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे.

प्रशासनाचा उशिरा जागी झालेला प्रतिसाद?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक (DRM) विपुल अग्रवाल यांनी रेल्वे रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मात्र, ही घटना घडल्यानंतर तब्बल १५ तासांनी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विपुल अग्रवाल यांनी आपल्या संपूर्ण ताफ्यासह ‘अन्नपूर्णा’ मेसची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणी दरम्यान अन्नाचे विविध नमुने (सॅम्पल्स) घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंबई आणि नागपूरहून मदत पाचारण
रुग्णांचा आकडा इतका मोठा आहे की रेल्वे रुग्णालयातील यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने मुंबई आणि नागपूर येथून अतिरिक्त नर्सिंग स्टाफला पाचारण करण्यात आले आहे. जोपर्यंत हा स्टाफ पोहोचत नाही आणि रेल्वे रुग्णालयात जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अनेक बाधित प्रशिक्षणार्थ्यांना उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.
कारण अद्यापही अस्पष्ट
इतक्या मोठ्या संख्येने विषबाधा होण्यामागे अन्नातील कोणता घटक कारणीभूत होता, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मेसमध्ये स्वच्छतेचा अभाव होता की कच्च्या मालात दोष होता, याचा तपास आता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, रेल्वेच्या मेस मधील अन्नाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



