Home Cities जामनेर “आंतरिक वेदनेतून कविता जन्म घेते” : ह.भ.प. स्नेहल दीदी महाराज

“आंतरिक वेदनेतून कविता जन्म घेते” : ह.भ.प. स्नेहल दीदी महाराज


पहूर (ता. जामनेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवितेचा खरा जन्म हा कवीच्या अंतर्मनातील वेदना, घालमेल आणि भावस्पर्शी अनुभूतीतून होतो. ही वेदना जेव्हा शब्दाला आकार देते, तेव्हा काव्य निर्माण होते, असे प्रेरणादायी विचार ह.भ.प. स्नेहल दीदी महाराज यांनी व्यक्त केले. पहूर येथे आयोजित खुल्या बालकवी संमेलनात त्यांनी अध्यक्षस्थानावरून बालसाहित्याचा आणि बालकवींच्या प्रतिभेचा गौरव केला. या संमेलनात तब्बल ८७ बालकवींनी सहभाग नोंदवत पहूर नगरीला साहित्यिक सुगंधाने भारावून टाकले.

ज्ञानेश्वरी भामेरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ज्ञानवेद प्रबोधिनी तर्फे पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात या भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी आणि पहूरचे भूमिपुत्र मधु पांढरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन करताना ते म्हणाले की, आजच्या बालकवींमधूनच उद्याचे संवेदनशील साहित्यिक घडतील. जामनेर तालुक्याच्या मातीत साहित्याचा सुगंध असून पद्मश्री ना. धों. महानोर, लेखक अनुराधा पाटील, रवींद्र पांढरे, तसेच डॉ. अशोक कोळी यांसारख्या महारथींनी या भूमीचा काव्यातील वारसा अधिक समृद्ध केला आहे.

संमेलनाची सुरुवात त्रिशा जाधव या चिमुकलीच्या स्वागत गीताने झाली, तर दहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या इशस्तवनाने वातावरण भावमय झाले. बालकवींनी आई-वडील, निसर्ग, कन्या, शेतकरी, शिवचरित्र, मृत्यू, स्त्रीभ्रूणहत्या, आयुष्य अशा अनेक विविध विषयांवर स्वतः रचलेल्या कविता सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री ना. धों. महानोर आणि बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर क्रीडा क्षेत्रात विशेष यश मिळवणाऱ्या दोन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. हरियाणा येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक पटकावणाऱ्या हर्षदा माळी तसेच राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत निवड झालेल्या शिक्षिका राजश्री शिंदे यांचा सन्मान स्मृतिचिन्ह, स्नेहवस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

समारोपीय कार्यक्रमात ‘विश्व गीतगंगा’ या कवितासंग्रहाचे लेखक विश्वनाथ वानखेडे आणि आर.टी. देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत बालकवींच्या प्रतिभेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा कल्पना बनकर यांनी केले. यशस्वीतेसाठी हरिभाऊ राऊत, रवींद्र लाठे, ईश्वर हिवाळे, राजेंद्र सोनवणे, प्रकाश जोशी, सुनील पवार आणि इतर विश्वस्तांनी योगदान दिले. सूत्रसंचालन रूपाली माळी यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थितीत विजय बोरसे, अमोल पाटील, भगवान जाधव, अजय देशमुख, किरण पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, शरद बेलपत्रे, प्रवीण कुमावत, विक्रम घोंगडे, सुरेश घोंगडे, सुभाष माळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनात सहभागी सर्व ८७ बालकवींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर कैलास माळी व दीपक जाधव यांनी प्रत्येक बालकवीला पेन भेट दिले. कार्यक्रमाच्या शेवटी शंकर भामेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Protected Content

Play sound