भुसावळ प्रतिनिधी | शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे द्वारकाबाई नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय ऑनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. पुण्याचे कवी देवा झिंजाड हे २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ‘कविता आई-बापाच्या’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे २७ जुलै राेजी सकाळी १०.३० वाजता ‘वेदनेचा तळ शोधणारी कविता’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार अाबिद मन्सूर शेख हे २९ जुलै रोजी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर यंदाही मर्यादा आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही व्याख्यानमाला झूम मिटिंगद्वारे घेण्यात येत आहे. मनोरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेल्या नव्या पिढीला वाचन, श्रवणाची गोडी लागावी म्हणून फाउंडेशनने हा सांस्कृतिक वैचारीक उपक्रम सुरू केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून निरंतर सुरू असून यंदा सातवे वर्ष आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.