वाराणसी (वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रावर स्थावर आणि जंगम मालमत्तेचा जो तपशील दिला आहे त्यात त्यांच्याकडे फक्त ३८ हजार ७५० रुपये इतकी रोख रक्कम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रात मोदींच्या मालकीचं एकही वाहन नसल्याचंही म्हटले आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या उत्पन्नाबाबत मात्र कोणताही तपशील दिलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत खातं असून त्या खात्यात ४ हजार १४३ रुपये इतकी रक्कम जमा आहे. पंतप्रधानांनी बॉन्डमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांनी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चरचे २० हजार रुपयांचे बॉन्ड खरेदी केले आहेत. पंतप्रधान एकूण २ कोटी ५१ लाख ३६ हजार ११९ रुपयांचे धनी आहेत. २०१८ मध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींची मालमत्ता जाहीर करण्यात आली होती. तेव्हा मोदींकडे एकूण २.२८ कोटींची संपत्ती होती. त्याआधी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींकडे सुमारे दीड कोटींची संपत्ती होती. गेल्या चार वर्षांत मोदींची संपत्ती सुमारे ७५ लाखांनी वाढली आहे. पंतप्रधान म्हणून मिळणाऱ्या पगारामुळे मोदींच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये मोदींचं वार्षिक उत्पन्न ९.६९ लाख इतकं होतं तर २०१८मध्ये वार्षिक उत्पन्न १९.९२ लाख इतकं झालं आहे.
मोदींकडे असलेली मालमत्ता
– १.१३ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या (४५ ग्रॅम सोने)
– राष्ट्रीय बचत पत्रामध्ये ७ लाख ६१ हजार ४६६ रुपये तर एलआयसीमध्ये १ लाख ९० हजार रुपयांची वीमा पॉलिसी.
– मोदींनी गुजरातमध्ये २००२ मध्ये १.३० लाखात खरेदी केलेल्या प्लॉटची सध्याची किंमत १ कोटी १० लाख रुपये.