नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील करदात्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या आधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा ‘ट्रान्सपरंट टॅक्सेशन- ऑनिरिंग द हॉनेस्ट’ नावाची योजना जाहीर करणार आहेत.
प्रत्यक्ष कर सुधारण्यासाठी हे एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. ही योजना जाहीर करण्याच्या कार्यक्रमात विविध उद्योग मंडळांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी , सीए असोसिएशन आणि करदाते देखील भाग घेतील.
उद्योगांना अधिकाधिक स्पर्धात्मक बनविण्याचा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या अभियानाचा हिस्सा आहे. हे पॅकेज पीएम गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेनंतरची मोठी घोषणा ठरणार आहे. याआधी आणल्या गेलेल्या योजना कोरोनाच्या झटक्यापासून उद्योगांना वाचविण्यासाठी होत्या. आता अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय अन्य काही घोषणाही केल्या जाण्याची शक्यता आहे.