Home राजकीय पंतप्रधान मोदींकडून नवीन पीएमओ ‘सेवा तीर्थ’ संकुलाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींकडून नवीन पीएमओ ‘सेवा तीर्थ’ संकुलाचे उद्घाटन


नवी दिल्ली-वृत्तसेवा । पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता आजपासून अधिकृतपणे बदलला आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी नव्या ‘सेवा तीर्थ’ संकुलाचे तसेच कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय रायसीना हिलवरील साऊथ ब्लॉक येथे कार्यरत होते.

उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक या इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. त्या काळात ब्रिटिश सत्तेची स्वप्ने साकार करण्यासाठी या इमारतींचा वापर झाला. स्वतंत्र भारताने आता गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “दिल्लीतील अनेक ऐतिहासिक इमारतींवर गुलामगिरीच्या खुणा दिसतात. स्वतंत्र भारतात शहीद सैनिकांसाठी भव्य राष्ट्रीय स्मारक नव्हते. २०१४ नंतर देशाने ठरवले की गुलामगिरीची मानसिकता सहन केली जाणार नाही. या निर्णयांमागे सेवाभावी भावना आहे.”

नवीन ‘सेवा तीर्थ’ संकुलात आता पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय कार्यरत राहणार आहेत. आजपासून पीएमओचे कामकाज साउथ ब्लॉकमधून नव्या ठिकाणी हलवण्यात येत आहे.

उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांनी ‘सेवा तीर्थ’ या नावाचा फलक अनावरण केला. संकुलाच्या भिंतीवर देवनागरी लिपीत ‘सेवा तीर्थ’ असा शिलालेख कोरलेला असून त्याखाली ‘नागरिक देवो भव’ हा मंत्रही अंकित करण्यात आला आहे.

१९४७ पासून जवळपास ७८ वर्षे पंतप्रधानांचे कार्यालय साउथ ब्लॉकमध्ये होते. ही इमारत देशातील सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखली जात होती. आता ‘सेवा तीर्थ’मधून पंतप्रधान कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.


Protected Content

Play sound