पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील विंध्यवासीनी माता मंदिर डोंगर परिसरात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कृषि व ग्रामिण विकास बँक (नाबार्ड), माऊली वृक्ष प्रेमी गृप, स्पार्क एरिगेशन प्रा.लि., श्री छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान व सर्वोदय संस्था यांचे माध्यमातून वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय कृषि व ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) चे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे यांचेकडून सामाजिक समूह, संस्था व व्यवस्थापन यांना पर्यावरण संजीवणीसाठी सजग करत पर्यावरण समृद्धीसाठी अनोखे पाऊल उचलत पर्यावरण गतीविधीला मूर्त स्वरूप मिळावे यासाठी बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथील विंध्यवासीनी माता मंदिर परिसरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेशी प्रजातीतील वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत हरित चळवळीला बळ देण्यात आले.
यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे यांनी नाबार्ड च्या माध्यमातून शेती, शेतकरी व ग्रामोत्थान घडावे यासाठी अविरतपणे कार्य साकारले जाते. शासकीय पातळीवरील विविध अभियानही हाती घेतली जातात, त्याचाच एक भाग म्हणून आजची वृक्ष लागवड वसुंधरेची श्रीमंती वाढवणारी ठरेल असे प्रकर्षाने जाणवते, या माळरानावर निसर्गाचा अद्वभूत वारसा निर्माण व्हावा यासाठी येथील पर्यावरण चळवळीत काम करणारे समूह, संस्था व व्यवस्थापन यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. कृषिभूषण सागर धनाड यांनी वृक्ष रोपे कशा पद्धतीने रोपण करावे याबाबत प्रात्यक्षिकातून माहिती सर्वांना दिली. तसेच जैवविविधता बहरण्यासाठी व्यापक काम होणे येणाऱ्या काळाची गरज असून त्या दिशेने लोकसहभागातून काम उभे करावे लागेल त्या दिशेने येथील कार्य पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतीविधीचे जिल्हा संयोजक मधुकर पाटील व जिल्हा मंडळ सदस्य उल्हास सुतार यांनीही पर्यावरण संवर्धन काळाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी टेकडी व पर्यावरण प्रेमी यांची माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच बुर्हाण तडवी, उपसरपंच शशिकांत वाघ, सदस्य गुलाब तडवी, विंध्यवासिनी माता ट्रस्टचे संचालक उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील, क्रिएटिव्ह स्कुलचे प्राचार्य यशवंत पवार, प्रयोगशील शेतकरी बापूराव पाटील, माऊली वृक्षप्रेमी ग्रुपचे किशोर पाटील, दुर्वास कोळी, राजु गाव्हंडे, संदीप दारकोंडे, सोनू सैंदाणे यांचेसह पर्यावरण प्रेमी यांनी सहभाग घेतला. वृक्ष लागवडीनंतर उपस्थितांनी लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणार असल्याची शपथ घेतली.