नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्मला सीताराम यांच्या वक्तव्याने उडालेली धमाल शांत होत नाही तोच आज केंद्रीय वाणिज्य व रेल्वेमंत्री गुरूत्वाकर्षण आणि आईनस्टाईनबाबत अचाट वक्तव्या केल्याने त्यांची सोशल मीडियातून खिल्ली उडविण्यात येत आहे.
देशातील मंदिच्या वातावरणामुळे नागरिक तणावग्रस्त झालेले असतांना केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेते अचाट वक्तव्ये करून या विषयापासून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपुर्वीच अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी ओला व उबरसारख्या सेवांमुळे वाहन उद्योगात मंदी आल्याचे कारण दिले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहेत. या पाठोपाठ आज पियुष गोयल यांनीही आपल्या विचीत्र वक्तव्याने धमाल उडवून दिली आहे.
आज केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी बोर्ड ऑफ टेडसोबत महत्वाची बैठक केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. याप्रसंगी एका पत्रकाराने त्यांना ५ ट्रिलीयन इकॉनॉमी आणि मंदीबाबत प्रश्न विचारला. यावर गोयल म्हणाले की, तुम्ही गणिताकडे पाहू नका. गणिताने आईनस्टाईन यांना गुरूत्वाकर्षणाचा शोध घेण्यासाठी कोणतीही मदत केलेली नाही. जर तुम्ही गत काळातील फॉर्म्युल्यांकडे पाहिले तर कोणत्याही प्रकारचे संशोधन अशक्य असल्याचेही ते म्हणाले.
गोयल यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियातून त्यांची यथेच्छ खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भन्नाट जोक आणि मीम्स समाज माध्यमांमधून शेअर केले जात आहेत. तर गोयल यांनी मात्र आपल्या वक्तव्याचा भलताच अर्थ घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण देऊन यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.