पिंप्री येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीतून विष घेवून आत्महत्या

रावेर प्रतिनिधी । वादळामुळे केळी बागाचे नुकसान झाल्यावर पुन्हा आता केळीवर आलेल्या सिएमव्ही रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत व त्यातून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकऱ्याने मंगळवारी रात्री विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रघुनाथ दामू सावळे (वय ५५) असे मयात शेतकऱ्याचे नाव आहे. रघुनाथ सावळे यांच्या शेतीवर युनियन बँकेचे २ लाख रुपये कर्ज असून त्यांच्या मुलाच्या नावावर ३ लाख रुपये कर्ज आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या वादळामुळे या शेतकऱ्याच्या शेतातील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर नुकताच केळीवर आलेल्या सिएमव्ही रोगामुळे केळी उपटून फेकण्याची वेळ आल्याने यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून व केळीच्या झालेल्या नुकसानीतून आलेल्या नैराश्येतून रघुनाथ सावळे यांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. उमेश रघुनाथ सावळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवलदार डांबरे करीत आहे.

Protected Content